Headlines :
Home » » सरकारची आत्महत्येकडे वाटचाल

सरकारची आत्महत्येकडे वाटचाल

Written By Admin on Sunday, October 2, 2011 | 2:14 AM

भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत अडवाणी यांचा दावा
लोकसभेच्या मध्यावधीसाठी सज्ज राहण्याचे पक्षजनांना आवाहन


नवी दिल्ली, १ ऑक्टोबर
अनेक मोठमोठ्या घोटाळ्यांमध्ये आणि अंतर्गत कलहात अडकलेल्या केंद्रातील संपुआ सरकारची आत्महत्येकडे वाटचाल सुरू झालेली आहे. हे सरकार केव्हापर्यंत टिकेल, २०१४ पर्यंतचा कालावधी पूर्ण करेल काय, हे सांगता येणे कठीणच आहे. या सरकारचे भवितव्य अधांतरी असल्याने लोकसभेच्या मध्यावधी निवडणुका अटळ असून, पक्षाजनांनी मध्यावधीसाठी आतापासूनच स्वत:ला सज्ज ठेवायला हवे, असे भाजपाचे मार्गदर्शक लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्ट केले. भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकार्‍यांना मार्गदर्शन करताना अडवाणी बोलत होते. केंद्रातील संपुआ सरकारने स्वत:च आत्महत्येचा मार्ग निवडला आहे. देशाच्या स्वातंत्र्योत्तर काळात अशी स्थिती आजवर कधीच कोणत्याही सरकारवर आलेली नाही. हे सरकार भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहे. एक क्षणही सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार या सरकारला नाही. नजिकच्या भविष्यात या सरकारचे काय होईल, याची कुठलीच हमी नसल्याने आपण निवडणुकीसाठी सज्ज राहायलाच हवे, असे मत अडवाणी यांनी व्यक्त केले. घोटाळ्यात अडकलेल्या आपल्या मंत्र्यांना वाचविण्याशिवाय दुसरे कोणतेही काम या सरकारकडे राहिले नाही. हे सरकार पूर्णपणे निष्क्रिय झाले असून, देशभरातील नागरिक सरकारला कंटाळले आहे, असे अडवाणी म्हणाले. येत्या ११ ऑक्टोबरपासूनच्या आपल्या रथयात्रेचा उद्देश निवडणुका नसून, भ्रष्टाचाराविरोधात जनजागृती निर्माण करणे हाच एकमेव उद्देश आहे. या सरकारवरून लोकांचा विश्‍वास उडाला आहे. हा विश्‍वास गमविण्यासाठी सरकारचे कर्मच कारणीभूत ठरले आहेत, असेही अडवाणही यांनी स्पष्ट केले. यावेळी संपुआ सरकारवर सडकून टीका करताना विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज म्हणाल्या की, देशभरातील जनता मोठ्या आशेने भाजपाकडे पाहात आहे आणि भाजपानेही लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी स्वत:ला सिद्ध करायला हवे. केवळ संपुआ सरकारमधील अस्थिरतेचा फायदा घेऊन निवडणुका जिंकता येणार नाही.तर, पक्षजनांनी तळागळातील लोकांपर्यंत पोहोचून त्यांच्यासाठी काहीतरी कार्य करण्याची आणि त्यांचा विश्‍वास जिंकण्याची आवश्यकता आहे. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते अरुण जेटली म्हणाले की, हे सरकार २०१४ पर्यंत टिकण्याची कुठलीही शक्यता नाही. वरिष्ठ मंत्र्यांमध्येच मतभेद निर्माण झाले आहे. एक मंत्री दुसर्‍याची हेरगिरी करीत आहे. अंतर्गत कलह इतका वाढला आहे की, सरकार केव्हा कोसळेल हे सांगणे फारच कठीण आहे.
Share this article :

Post a Comment

 
Support : Creating Website | Johny Template | Mas Template
Copyright © 2011. USTAD SAYEEDUDDIN DAGAR - All Rights Reserved
Template Created by Creating Website Published by Mas Template
Proudly powered by Blogger